अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला. जानेवारीत ते राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. मात्र पदभार स्वीकारण्यापूर्वीच ट्रम्प यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे अमेरिकेवर असणाऱ्या कर्जाचे. अमेरिकेवरील कर्जाचा डोंगर सध्या 36 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. अवघ्या चार महिन्यांत अमेरिकेचे कर्ज एक ट्रिलियन डॉलरने वाढले आहे.
प्रत्येक अमेरिकन नागरिकावर एक लाख डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे 84 लाखांच्या कर्जाची थकबाकी आहे. गेल्या आठवडय़ात ट्रेझरी विभागाने अमेरिकेच्या थकीत कर्जाची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार अमेरिकेवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस मोठा होत आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज 36 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे, तर जून 2024 मध्ये अमेरिकेवर 35 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज होते. म्हणजे अवघ्या चार महिन्यांत कर्जाचा बोजा एक ट्रिलियन डॉलरने वाढला.