चॅटजीपीटीच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर स्फोट, धक्कादायक माहिती आली समोर

अमेरिकेतील लास वेगास येथील ट्रम्प हॉटेलच्या बाहेर सायबर ट्रकमध्ये झालेल्या स्फोटाबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या स्फोटाच्या नियोजनासाठी चॅटजीपीटीचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी उघड केले आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लास वेगास येथील हॉटेलबाहेर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सायबर ट्रकचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. या स्फोटात एकाचा मृत्यू तर सात जण जखमी झाले होते. या स्फोटाबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. चॅटजीपीटीच्या सहाय्याने हा स्फोट घडविल्याचा दावा करण्यात आला आहे. या बातमीनंतर आता चॅटजीपीटीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

सायबर ट्रकमधील या हल्ल्यानंतर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी सांगितले की, वाहनात स्फोटक पदार्थ आणि गॅसचे डबे आधीच होते, त्यामुळे हा स्फोट झाला. यासोबतच त्यांनी सायबर ट्रकमध्ये कोणताही दोष नसल्याचेही स्पष्ट केले होते. एलन मस्क म्हणतात की, या सायबर ट्रकने मोठी दुर्घटना टाळण्यातही मदत केली. या अपघाताच्या तपासात एलन मस्क पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहेत. मस्क यांनी टेस्ला चार्जिंग स्टेशनवरील सर्व आवश्यक माहिती आणि व्हिडिओ फुटेजही पोलिसांना दिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर टेस्ला सायबर ट्रक घेऊन आलेल्या चालकाची ओळख पटली आहे. मॅथ्यू लिव्हल्सबर्गर असे त्याचे नाव आहे. दहशतवादी घटनेनुसार चालकावर कारवाई करण्यात येत आहे. एफबीआय हे प्रकरण इतर घटनांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे.