तरुणीचे संभाषणाचे अश्लील व्हिडीओ बनवून तिला खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अमन सिद्दिकीला अंबोली पोलिसांनी अटक केली.
पीडित तरुणी ही अंधेरी येथे राहते. ती एका खासगी कंपनीत कामाला आहे. दोन महिन्यांपूर्वी तिची सोशल मीडियावरून एकाशी ओळख झाली. ओळखीनंतर ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा व्हिडीओ कॉलवर ते संभाषण करायचे. तो तिला नकोसे कृत्य करण्यास भाग पाडत असायचा. त्याने तरुणीचे नकळत व्हिडीओ बनवले होते. ते व्हिडीओ तो तरुणीला पाठवून तिच्याकडे पैशाची मागणी करत होता. जर पैसे दिले नाही तर ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असायचा.
वारंवार पैशासाठी तो तिला धमकावत असायचा. या प्रकरणी तिने अंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीची अंबोली पोलिसांनी गंभीर दखल घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमनला गोरेगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.