अंबरनाथमध्ये रेशन दुकानात ‘रात्रीस खेळ चाले’,तांदूळ, गहू, रवा, साखर, चणाडाळीचा खुलेआम अपहार

महालक्ष्मीनगर परिसरात असलेल्या एका रेशन दुकानात ‘रात्रीस खेळ’ सुरू असल्याचे उघडकीस आली आहे. तांदूळ, गहू, रवा, साखर, चणाडाळीचा खुलेआम अपहार करण्यात आला असून गोरगरीबांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली आहेत. रात्रीच्या अंधारात तब्बल 3 लाख 74 हजार रुपयांचा काळाबाजार समोर आल्यानंतर शिधावाटप दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकानही सील करण्यात आले आहे.

अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मीनगर परिसरात असलेल्या अंबरनाथ मैत्रीण औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थांचे शिधावाटप दुकान आहे. मंगळवारी रात्री गणेशोत्सव रेशन किटमधील 270 लिटर तेल काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी पकडून टेम्पोसह पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी रेशनिंग दुकानातील अखेरचा साठा व दुकानात उपलब्ध असलेला साठा याची पंचांसमक्ष पडताळणी केली असता त्यामध्ये 2 हजार 875 किलो तांदूळ, 5 हजार 420 किलो गहू, ‘आनंदाचा शिधा’ (रवा, साखर, चणाडाळ इ.) 255 नग, ‘आनंदाचा शिधा’ तेल 270 नग आदींसह 3 लाख 74 हजार 852 रुपयांच्या शिधा जिन्नसांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले.

संस्था तयार करून दुकान थाटले

शिधावाटप संस्थेचे उषा पाटील, नंतलिना पाठक, सुषमा येरुणकर, आशा देशमुख, ललिता सपकाळ, शैला सावंत, शोभा मलाखांबे, शारदा प्रकाश पाटील, शर्मिली शिर्के या महिलांनी एकत्र येऊन मैत्रीण संस्था तयार करून शिधावाटप दुकान थाटले होते. दरम्यान शिधावाटप अधिकारी शशिकांत पोटसुते यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून दुकान सील करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.