अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत भीषण आग, स्पीड इंटरनॅशनल केमिकल कंपनीतील 10 कामगार बचावले

मोरिवली एमआयडीसीमधील स्पीड इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आज संध्याकाळी साडेसहाच्या मारास भीषण आग लागली. रासायनिक प्रक्रिया सुरू असतानाच स्फोटामागून स्फोट झाले आणि सर्वत्र आग पसरली. कंपनीत काम करणारे सुमारे दहा कामगार वेळीच बाहेर पळाल्याने त्यांचा जीव वाचला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मात्र ही आग एवढी मोठी होती की आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट अक्षरशः गगनाला भिडले होते. स्पीड कंपनीतील स्फोट व आगीने मोरिवली एमआयडीसीचा परिसर हादरला असून नजीकच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीमध्ये अनेक केमिकल कंपन्या असून यापूर्वीदेखील तेथे आगीच्या घटना घडल्या आहेत. स्पीड इंटरनॅशनल कंपनीमध्ये नेहमीप्रमाणे पोटॅशियम परमँनगेटसाठी लागणारे रसायन बनवण्याचे काम सुरू होते. आतमध्ये आठ ते दहा कामगार काम करीत असतानाच अचानक कानठळ्या बसणारा आवाज आला आणि आग लागली. रासायनिक प्रक्रिया चालू असतानाच हा प्रकार घडल्याने कामगारांमध्ये एकच पळापळ सुरू झाली. जीवाच्या आकांताने सर्वजण वेळीच बाहेर पडल्याने त्यांचा जीव बचावला. दरम्यान काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि एमआयडीसीमध्ये घबराट उडाली.

चौकशी करण्याचे आदेश
स्पीड इंटरनॅशनल कंपनीलील भीषण आगीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी लवकरच घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहेत. तसेच या कंपनीचे मालक कोण, सर्व प्रकारच्या परवानग्या घेतल्या होत्या का याचाही तपास केला जाणार आहे

आगीचे वृत्त समजताच अंबरनाथसह बदलापूर, उल्हासनगर तसेच एमआयडीसीचे सात ते आठ अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले व त्यांनी आग विझविण्यास सुरुवात केली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर कंपनीतील आग नियंत्रणात आली. रसायन असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, पण फोमच्या सहाय्याने आग विझविण्यात आली. स्पीड केमिकल कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून मोरिवली एमआयडीमध्ये असून त्यात सुरक्षेच्या उपाययोजना होत्या की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

धुराचे लोट 
मोरिवली एमआयडीसीत आग लागताच धुरांनी व ज्वालांनी परिसर हादरून गेला. आगीचे व धुराचे लोट अंबरनाथ शहरातूनही दिसत होते. आग लागल्यानंतर पोलीस कर्मचारी, अधिकारी व आपत्कालीन यंत्रणाही दाखल झाली व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. मात्र तोपर्यंत परिसरात पळापळ होताना दिसत होती. दरम्यान कंपनीतील बचावलेले सर्व कामगार धास्तावले आहेत.