
बीडमधील अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाकडून परळी औष्णिक विद्युत केंद्राचे बँक खाते जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे खाते आहे. जे आता जप्त करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परळी येथील वडगाव येथे 250 मेगावॅट विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्यात आल्या होत्या. मात्र जमिनी घेऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आला नाही.
आपल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने येथेही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयाने 2022 मध्ये शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मंजूर केला होता. मात्र परळी औष्णिक विद्युत केंद्राने तो शेतकऱ्यांना दिला नाही. यानंतर शेतकऱ्यांनी न्यायालयात वसुली अर्ज दाखल केला. ज्यावर सुनावणी करताना अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाकडून परळी औष्णिक विद्युत केंद्राचे बँक खाते जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.