खासगी बसेस खरेदी स्थगितीची अधिकृत सूचना सरकारने काढावी, अंबादास दानवेंची मागणी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 1,310 खासगी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देऊन चौकशी देण्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. परंतु याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत सूचना काढलेली नाही. त्यामुळे सरकारने या बसेसच्या स्थगिती व चौकशीबाबत अधिकृत सूचना काढावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

भाडेतत्त्वावर खासगी बस खरेदीच्या नावाखाली सरकारला लुटण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून केला जातोय. यात 2 हजार 800 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी यावेळी केला आहे. मे. अँथोनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रा. लि, मे. सिटी लाइफलाइन ट्रॅव्हल्स प्रा.लि. आणि मे. ट्रॅव्हल टाइम प्रा. लि. या तीन कंपन्यांना कंत्राट दिले असून या कंपन्या दिल्ली, गुजरात व तामिळनाडूच्या आहेत, असे अंबादास दानवे म्हणाले.

प्रती वर्ष 2 हजार 800 कोटी रुपयांचा भुर्दंड सरकारला बसणार आहे. सरकारने या निर्णयाला स्थगिती देताना पुन्हा एकदा याच्यापेक्षा जास्त दर येऊ नये. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना अशाप्रकारे उधळपट्टी होऊ नये, असे खासगी बसेस भाडे खरेदीच्या निर्णयावर दानवे यांनी म्हटले.

सरपंच हत्येचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवावा

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चाललावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. वाल्मीक कराड याचा खटला चालविण्यासाठी सरकारी वकील एस. एस. देशपांडे यांनी नकार का दिला याचीही चौकशी झाली पाहिजे. तसेच या प्रकरणात चौकशीसाठी स्वतंत्र वरिष्ठ अधिकारी यांची नेमणूक करावी, अशी मागणीही अंबादास दानवे यांनी केली.