मतमोजणीस्थळी कर्मचाऱ्यांची व राजकीय प्रतिनिधींसाठी आवश्यक उपाययोजना करा, अंबादास दावनेंचे निवडणूक आयोगाला पत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीच्या आदल्या दिवशी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहले आहे. या पत्रातून त्यांनी मतमोजणीस्थळी निवडणूक कर्मचाऱ्यांची व राजकीय प्रतिनिधींसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

”महाराष्ट्रात पाच टप्यात झालेल्या निवडणुक प्रक्रियेदरम्यान राज्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे, मतदान केंद्रावर सावलीसाठी मंडप नसणे व बुथमध्ये वीज नसल्याने मोठ्या प्रमाणावर उकाडा निर्माण होणे अशा अनेक गैरसोयी झाल्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी उद्भवली होती. तर मुंबईत संथ गतीने मतदान होण्यामागे आवश्यक त्या सुविधा नसणे हे सुद्धा एक कारण होते. तथापि उक्त परिस्थिती लक्षात घेता तसेच उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मतमोजणी प्रतिनिधीची संख्याही जास्तच राहणार आहे. यामुळे मतमोजणी दिवशी सदरील स्थिती पुन्हा उद्भवू शकते. यामुळे राज्यातील सर्वच मतमोजणी स्थळी उपरोक्त नमूद व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच गैरसोय होऊ नये, म्हणून काळजी घेण्यात यावी. मतमोजणी दिवशी मतमोजणी स्थळी निवडणूक कर्मचारी व राजकीय पक्ष मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मी आपणांस विनंती करत आहे, असे दानवे यांनी त्यांच्या पत्रात लिहले आहे.