महापालिकेच्या कामकाजाकडे कुणाचं लक्ष नाही, फक्त ओरबडण्याचे काम सुरू आहे, अंबादास दानवे यांची टीका

”मुंबई पाऊस पडतो हे काही नवीन नाही. अद्याप एवढा पाऊस देखील पडलेला नाही. असं असतानाही संपूर्ण मुंबई भरली आहे. महापालिकेच्या कामकाजाकडे कुणाचं लक्ष नाही, त्यामुळे मुंबई तुंबली”, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.

मुंबईत रविवारी रात्री 1 ते सोमवारी सकाळी 7 या सहा तासात मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे जागोजागी सखल भागात पाणी साचले. रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचल्याने रेल्वे सेवा बरेच तास ठप्प होती. त्यामुळे ऑफिसला निघालेल्या कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल झाले.

यावरून अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे. ”तसा पाहायला गेलं तर अजुनही जोरदार पाऊस झालेला नाही. असं असताना ठिकठिकाणी पाणी भरलंय. महापालिकेच्या कामकाजाकडे कुणाचं लक्ष नाही, त्यामुळे मुंबई तुंबली आहे. मुंबईत पाऊस येणं हे अचानक झालेलं नाही. हे सगळं माहित असतानाही पावसाळी कामे झालेले नाहीत हे यावरून स्पष्ट होतंय. आदित्य ठाकरे पालकमंत्री असताना याचे व्यवस्थित नियोजन झाले होते. मात्र आता फक्त मुंबई ओरबडण्याचे काम सुरू आहे”, अशी टीका अंबादाास दानवे यांनी केली.

दानवे यांनी वरळीतील हिट अँड रन प्रकरणावरूनही मिंधे सरकारला फटकारले आहे. ”पुण्यात जशी घटना घडली तशीच घटना मुंबईत घडली आहे. जे आमच्यातून गेलेले गद्दार लोकं आहेत त्यांचे उपनेते राजेश शहा यांच्या मुलाच्या वाहनाने हा अपघात घडवला आहे. अद्याप हा आरोपी मुलगा फरार आहे. सत्ताधारी नेत्याचा मुलगा सर्व सामान्य कुटुंबातील महिलेला धडक देतो व फरफटत नेतो. धडकेनंतर थांबण्याऐवजी तिला फरफटत नेले. जर तो थांबला असता तर तिचा जीव वाचला असता. महाराष्ट्रात सर्वसामन्याचा जीव किती सहज घेता येतो हे कालच्या घटनेवरून दिसून येतेय. सरकार यात बिलकूल गंभीर नाही. मुख्यमंत्र्यांच्या हातात एवढी मोठी यंत्रणा आहे. तुम्ही भल्या भल्या विकेट घेता असं म्हणता पण जर आपल्या नेत्याला व त्याच्या मुलाला वाचवत असाल तर हा अपराध होईल, अशा इशारा दानवे यांनी मुख्यमंत्र्‍यांना दिला.