भाजपने आम्हाला नियम कायदे शिकवू नयेत, अंबादास दानवे यांनी सुनावले

राहुल गांधी यांच्या संसदेतील वक्तव्यावरून हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर सोमवारी विधान परिषदेत गोंधळ घालणाऱ्या सत्ताधाऱयांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चांगलाच ‘प्रसाद’ दिला. दरम्यान मंगळवारी विधानभवनाचे काम सुरू होण्यापूर्वी अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ”कायदे व संविधानाला स्वत:ची जहांगीर समजणाऱ्यांनी आम्हाला नियम कायदे शिकवू नये, असे दानवे यांनी भाजपला सुनावले आहे.

”मला असं वाटतं भाजपने आम्हाला नियम व कायदे शिकवू नये. ज्यांनी राहुल गांधींना संसदेतून निलंबीत केलं होतं, ज्यांनी 150 खासदारांना निलंबीत केलेलं अशा भाजपने उद्धव ठाकरेंना व मला कायदा शिकवायची गरज नाही. सदनातून दीडशे लोकांना निलंबित करणाऱ्यांनी सभागृहाची कोणती गरिमा ठेवली होती आता त्यांना कायदे संविधान आठवायला लागले आहेत. इतके दिवस त्यांना कायदे नियम त्यांच्या घरची जहांगीर, त्यांच्या घऱचे पाणी भरणारे वाटत होते”, अशी टीका दानवे यांनी केली.

”सभागृहात सभापतींशी बोललं पाहिजे. माझ्याकडे अंगविक्षेप करायची गरज नव्हती. मी शिवसैनिक आहे. शिवसैनिकाच्या बाण्यानेच उत्तर दिलेलं आहे. विरोधी पक्ष नेता आक्रमकच असला पाहिजे. जे बोललो ते मान्य करतो. मी त्यांच्यासारखा पळपुटा नाही. प्रसाद लाड सारखे लोक धंद्या पाण्यासाठी स्वत:चा कंपन्या वाढवण्यासा जिथे सत्ता आहे तिथे घुसतात. तसे आम्ही नाही. हे लोकं काय हिंदुत्व बोलतात. हिंदुत्वासाठी आम्ही काय काय केलं यांना काय माहित”, असे दानवे म्हणाले.