उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत सामील करून घेण्यास विरोध केला होता. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवत नवाब मलिक यांच्यावर आरोप असताना त्यांना महायुतीमध्ये सामील करून घेणे योग्य ठरणार नाही असे म्हटले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला अजित पवार यांच्याकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. बुधवारी अजित पवार गटाची त्यांच्या देवगिरी बंगल्यावर एक बैठक पार पडली. या बैठकीला नवाब मलिक देखील उपस्थित होते. त्याचा व्हि़डीओ समोर आल्यानंतर अजित पवारांनी फडणवीसांच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या पत्रप्रपंचाला उकिरडा दाखवून @nawabmalikncp आज भाजपमित्रांच्या बैठकीला हजर झाले! भाजप कार्यकर्त्यांनी मलिकांसाठी सतरंजी अंथरण्याची, खुर्ची मांडण्याची सवय आता लावून घ्यायला हवी. सतरंजी परत गोळा करायला आणि खुर्ची पुसायला खोके गॅंग आहेच!… https://t.co/xkxLEhyHDY
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 3, 2024
दरम्यान यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी एक खोचक ट्विट केले आहे. ”उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रप्रपंचाला उकिरडा दाखवून नवाब मलिक आज भाजप मित्रांच्या बैठकीला हजर झाले! भाजप कार्यकर्त्यांनी मलिकांसाठी सतरंजी अंथरण्याची, खुर्ची मांडण्याची सवय आता लावून घ्यायला हवी. सतरंजी परत गोळा करायला आणि खुर्ची पुसायला खोके गॅंग आहेच”, असा खोचक टोला दानवेंनी लगावला.