टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र राज्यातील भाजप नेत्यांनी चक्क विधानपरिषदेत टीम इंडियाच्या खेळाडूंचा अभिनंदन प्रस्ताव आणण्याऐवजी भाजपचे आमदारा व बीसीसीआयचे खजीनदार आशिष शेलार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला. विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा आरोप केला असून भाजपने केलेला हा प्रकार म्हणजे टीम इंडिया व खेळाडूंचा अपमान असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान परिषदेत सभात्याग केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी भाजपला फटकारले.
”हिंदुस्थानच्या संघाने विश्वचषक जिंकल्यावर खेळाडूंचे अभिनंदन व्हायला हवे. मात्र भाजपचे नेते त्या ऐवजी बीसीसीआयचे खजीनदार आशिष शेलार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न करत होते. खेळाडू मेहनत घेतात. देशाचं नाव उंचावतात. मात्र भाजप खेळाडूंचे अभिनंदन सोडून त्यांच्या नेत्याचे अभिनंदन करण्यासाठी सांगत आहे”, असे दानवे म्हणाले.
”भाजपचे हे वागणे म्हणजे टीम इंडिया व खेळाडूंचा अपमान आहे. पण त्याच्याशी भाजपला काही घेणेदेणे नाही. त्यांच्याकडून केवळ स्वत:च्या नेत्यांचा विचार केला जातो. सदनात सभापतींकडून पक्षपातीपणा केला जातोय. या विषयांवर भाजपच्या सदस्यांना बोलू दिलं जातंय. पण विरोधी पक्षातील सदस्यांना बोलू दिले जात नाही. त्यामुळे आम्ही सभात्याग केला. लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे”, अशी टीका दानवे यांनी केली.