राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला वेशीवर टांगलं! केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीशी छेडछाड, फडणवीसांना टॅग करत अंबादास दानवेंचा संताप

भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची छेड काढण्याला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. या घटनेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

मुक्ताईनगरात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचे फोटो, व्हिडीओ काढणाऱ्या टवाळखोरांनी शासकीय गार्ड आणि खडसे यांच्या लोकांना धक्काबुक्की केली. हे प्रकरण घेऊन मंत्री रक्षा खडसे पोलीस ठाण्यात जात असतील तर राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती किती पाताळात गेली आहे हे दिसत आहे. देवेंद्र फडणवीसजी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला वेशीवर टांगले आहे, हेच यातून स्पष्ट होते. काय करताय आपण? सध्या यात्रेत सुरक्षा देता येत नसेल तर मग मुली सुरक्षित आहेत कुठे? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

प्रकरण काय?

महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रा भरते. या यात्रेत फराळ वाटप करत असताना रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली. टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला होता. त्यानंतर सायंकाळीही असाच प्रकार घडला. सुरक्षा रक्षकासह यात्रेत फिरत असताना याच टवाळखोरांनी रक्षा खडसे यांच्या मुलीचो फोटो, व्हिडीओ काढले. सुरक्षा रक्षकाने यास विरोध केला असता टवाळखोरांनी त्यांच्यासोबत झटापट केली.

देवाभाऊंच्या राज्यात सत्ताधारी मंत्र्यांच्या मुलीही असुरक्षित, रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत भर रस्त्यात छेडछाड