धर्मादाय रुग्णालयं ही केवळ नफेखोरीसाठी काम करतात; पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेवरून अंबादास दानवेंचा आरोप

महाराष्ट्रात अशा घटना मोठ्या रुग्णालयात सर्रास होतात. आता ही घटना आमदाराच्या सेक्रेटरींची पत्नी आहे म्हणून ती समोर आली आहे. सरकार अशा धर्मादाय रुग्णालयांना जागेपासून पाणी, वीज असेल सगळ्यांच्या सवलती देते. पंरतू जनतेला याचा कोणताही लाभ होत नाही. मागच्या अधिवेशनामध्ये या विषयी विधेयक संमत झालेलं आहे. पण धर्मादाय रुग्णालयं ही फक्त नफेखोरीसाठी काम करतात. यांना जनतेच्या आरोग्याशी, रुग्णांशी काही देणं-घेणं नाही. अशा मानसिकतेत ते असतात. यामुळे याविषयी राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील, असे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

आजार काय आहे, रुम कोणती आहे, ऑपरेशन कोणतं आहे, डॉक्टर्स कोण येणार आहेत? हे काही न ठरताच दहा लाख रुपये भरायला सांगतात. सरकार मोठ-मोठ्या योजना आणतंय. कोणत्याही रुग्णालयात जा मोफत उपचार मिळेल, असं म्हणतं. अशा काळात अशा पद्धतीने एका महिलेच्या जीवाशी जर रुग्णालय खेळ खेळत असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे, असे अंबादास दानवे पुढे म्हणाले.

‘दीनानाथ’ने पैशांसाठी उपचार नाकारल्याने गर्भवतीचा मृत्यू, पुण्यात रुग्णालयातही माणुसकी मेली

एकाच हॉस्पिटलमध्ये होतं असं नाही, हे सगळ्याच हॉस्पिटलला होतं. तुम्ही महाराष्ट्रातले काय देशातले हॉस्पिटल घ्या. महाराष्ट्रात धर्मादायसाठी जो कायदा लागू आहे त्याची अंमलबजावणी कुठेच होत नाही. धर्मादायमधून एखाद्या ऑपरेशनला गेलं तर महिन्याभरानी या, पैसे भरणार तर उद्या ऑपरेशन करू म्हणतात. अशा पद्धतीने यांची मुजोरी सरकारने नाही मोडली तर जनता मोडून काढेन, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला. प्रत्येक जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालयात जे उपचार केले जातात त्याच्यासाठी अधिकारी नेमलेला आहे. कोणताच अधिकारी कामात नसतो. धर्मादाय रुग्णालयासाठी मदत करणाऱ्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची यादी सरकारने प्रसिद्ध केली आहे. एखाद्या अधिकाऱ्याला फोन लावा तुम्ही, कधी भेटत नाही. कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड रिकामे आहेत, हे ऑनलाइन माहिती द्यायला सांगितलेलं आहे. परंतू, अशी कोणतीही अपडेट धर्मादायकडे नसते, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.