विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षांची बाजू ऐकून न घेता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांची मुजोरी चव्हाट्यावर आणली. पाशवी बहुमताच्या बळावर निलंबन केलं, असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला.
दोन्ही बाजूंनी गोष्टी झाल्या होत्या. पण एकाच बाजूवर कारवाई झाली आहे. पाशवी बहुमताच्या बळावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी अशाच प्रकारे दीडशे खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं, असं अंबादास दानवे म्हणाले.
आता राहिला सभागृहाच्या डेकोरमचा प्रश्न, त्यावर दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती. वैयक्तीक कुणाची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु, पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन करण्यात आलं आहे. या विषयी जनतेच्या दरबारात निश्चितच आवाज उठवू, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.