बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणात अटक असलेल्या वाल्मीक कराडची मालमत्ता जप्त करण्याचा अर्ज एसआयटीकडून देण्यात आला आहे. मात्र ही घटना घडल्यानंतर वाल्मीक कराड अनेक दिवस फरार होता. या काळात त्याने आपल्या मालमत्ता हस्तांतरीत केल्या असाव्यात, त्यामुळे या सर्व प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करण्यात यावी आणि मालमत्ता जप्तीसाठी ईडीनेच पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.
नांदेड येथे लोहा व नांदेड येथील शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या महत्वाच्या बैठकीसाठी ते आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील उपस्थित होते.
सरकार वाल्मीक कराडला पाठीशी घालत आहे. तो कुठे आहे याची माहिती मीडियाला मिळत होती, मग पोलिसांना का नाही? तो किती दिवस फरार होता? त्याला कुणी फरार केले? हे सगळे आता उघड झाले असून या काळात त्याने आपली संपत्ती, रोकड, मालमत्ता हस्तांतरीत केल्या असाव्या. सरकारनेही ईडीमार्फत चौकशी करून दूध का दूध, पाणी का पाणी केले पाहिजे, असे दानवे म्हणाले. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे, असेही ते म्हणाले.
फायद्यात असलेली एसटी तोट्यात कशी गेली?
एसटी महामंडळाने केलेली भाडेवाढ ही संतापजनक असून, तीन महिन्यापूर्वीच एसटीच्या उपाध्यक्षांनी एसटी फायद्यात आहे, असे सांगितले होते. नागपूरच्या अधिवेशनात एसटी महामंडळाच्या टेंडर घोटाळ्यासंदर्भात आम्ही आवाज उठविला होता. त्याची चौकशी न करता फायद्यात असलेली एसटी तीन महिन्यात कशी काय तोट्यात गेली, असा सवाल दानवे यांनी केला.