
शक्तिपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे असल्याची ग्वाही विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. मुंबई येथील आझाद मैदानावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित धडक मोर्चास उपस्थित राहून अंबादास दानवे यांनी संबोधित केले.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हापूर येथील सभेत शेतकऱ्यांचा विरोध असेल तर राज्य सरकार शक्तिपीठ महामार्ग करणार नसल्याचे आश्वासन दिलेला व्हिडिओ यावेळी दानवे यांनी दाखवला. यापूर्वीच राज्यातील देवस्थानांना जोडण्यासाठी चांगले रस्ते असताना शक्तिपीठ महामार्गाची काय आवश्यकता? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी राज्य सरकार विचारला. राज्य सरकार कंत्राटदारांच्या फायद्यासाठी हा शक्तिपीठ महामार्ग करत असून शेतकरी हिताशी शासनाला काही देणे घेणे नाही, अशी टीका दानवे यांनी केली.
विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आणि आता महायुतीचे सरकार आल्यानंतर सरकारला निवडणुकीपूर्वी दिलेल्या आपल्या शब्दाचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना राज्य शासनाकडून हा महामार्ग केला जात आहे. राज्य शासन अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्ग करत असेल तर शेतकरी बांधवांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे असल्याची ग्वाही अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिला. तसेच, या प्रकरणी विधानपरिषद सभागृहात विरोधीपक्षांच्या वतीने स्थगन प्रस्ताव सादर केल्याची माहिती यावेळी दानवे यांनी दिली.
राज्यात तीन वर्षांत रस्ते अपघातांत 46 हजार जणांचा मृत्यू, ड्रग्ज सेवनाची चाचणी करण्यासाठी उपकरणे
याप्रसंगी आमदार जयंत पाटील, सतेज पाटील, कैलास पाटील, सचिन अहिर, प्रवीण स्वामी, राजू नवघरे, राजू शेट्टी व दिलीप सोपल उपस्थित होते.