राज्यात फक्त पोस्टर सरकार, कायदा मजबूत नसल्याने महिलांवर अत्याचार! अंबादास दानवे यांचे टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेचा गवगवा करणारे सरकार महिलांची सुरक्षा करण्यास अपयशी ठरले आहे. राज्यातील यशश्री शिंदे दाऊद शेख सरकार मजबूत नाही, त्यामुळे कायदा मजबूत नाही. परिणामी महिलांवरील अत्याचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. लाडकी बहीण फक्त पोस्टरवर मर्यादित ठेवणाऱ्या या पोस्टर सरकारच्या कार्यकाळात राज्यात लाडकी बहीण सुरक्षित राहिलेली नाही, असे टीकास्त्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज खोके सरकारवर सोडले.

दरम्यान, दानवे यांनी आज नवी मुंबईत येऊन अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याशी तपासाबाबत चर्चा केली.

बेलापूर येथील विवाहिता अक्षता म्हात्रे यांना तीन पुजाऱ्यांनी आपल्या वासनेची शिकार बनवले. त्यानंतर त्यांची दगडाने ठेचून हत्या केली. यानंतर उरण येथील तरुणी यशश्री शिंदे हिची तिच्या प्रियकराने अत्यंत निघृणपणे हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले.

या दोन्ही हत्याकांडानंतर नवी मुंबईत संतापाची लाट उसळली आहे. पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज उरण येथे जाऊन यशश्री शिंदे यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. त्यानंतर कोपरखैरणे येथे जाऊन त्यांनी अक्षता म्हात्रे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. नंतर त्यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन यशश्री शिंदे यांच्या मारेकऱ्याला लवकर अटक करण्याची मागणी केली. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी, भावना घाणेकर, शीतल देवरुखकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस रेखा ठाकरे, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, दिनेश पाटील, गणेश शिंदे, विनोद म्हात्रे, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, उपजिल्हा संघटक वैशाली घोरपडे आदी उपस्थित
होते.

सरकार जागृत नाही

राज्यातील मिंधे सरकार हे जागृत नाही. हे सरकार फक्त पोस्टरबाजी करण्यात पटाईत आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. राज्यातील महिला सुरक्षित आहेत का, हा प्रश्न आता सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत महिलांवर हल्ला झाल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, अशी टीका यावेळी अंबादास दानवे यांनी केली.

नागोठणेमध्ये कडकडीत बंद

अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा या मागणीसाठी नागोठणे शहरात नागरिकांनी आज कडकडीत बंद पाळला. नागरिकांनी जोगश्वरी माता मंदिर परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत घडक मोर्चा काढला. या मोर्चात बापू रावकर, किशोर म्हात्रे, जांबेकर, श्रेया कुंटे, मंदार परांजपे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.

दोन महिलांची हत्या आणि हॉस्पिटलच्या छळवणुकीमुळे एका पित्याची आत्महत्या या दुर्दैवी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे जोखमीच्या ठिकाणी गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.