ईव्हीएम सरकारने जनतेला न्याय दिला नाही,विकासासाठी निधीची तरतूद नाही; अंबादास दानवे यांची टीका

हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यानी महायुती सरकारवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, सरकारने अधिवेशनात मागील काळातीलच काही योजना सांगितल्या. विदर्भाच्या वाट्याला काहीही मिळाले नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिघडलेली आहे. बीड प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड अजूनही फरार आहे, त्याला कोणाचा पाठिंबा आहे ते सर्वांना माहिती आहे. परभणी घटनेत पोलिसांच्या लाठीमारात सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला, कल्याणमध्ये मराठी माणसावर अन्याय करणारी घटना घडली, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

पुरवणी मागण्या या फक्त खर्चासाठी होत्या, विकासासाठी यात एका पैशाचीही तरतूद नाही. विदर्भ व मराठवाड्यातील काही सिंचन प्रकल्पावर मुख्यमंत्री बोलले पण त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. कांदा निर्यात मुल्य 20 टक्के हटवण्यावर निर्णय नाही. शेतकऱ्यासाठी काहीच नाही. अनुदानही दिले नाही. ईव्हीएम सरकारने जनतेला न्याय दिला नाही. विरोधी पक्ष म्हणून सरकारला अधिवेशनात जाब विचारला यापुढेही मजबुतीने सरकारला जाब विचारत राहू असेही अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना आमदार सचिन अहिर, सुनिल प्रभू आदी उपस्थित होते.