‘नदी जोड’चे नवीन भूत बाटलीतून आज बाहेर आलं, अंबादास दानवे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आष्टीत सभा झाली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ‘नदी जोड’ प्रकल्पाचा उल्लेख केला. मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना आता मोडीत निघाली अशी टीका करत ‘नदी जोड’चे नवीन भूत बाटलीतून आज बाहेर आलेले दिसले असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी लगावला.

एक्सवर पोस्ट करून अंबादास दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आत्ताच आष्टी तालुक्यात भाषण झाले. एकूण भाषण पाहता, मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना आता मोडीत निघाली असंच दिसतंय. कारण या योजनेच्या नावाचा साधा उल्लेखही आज भाषणात नव्हता. उलट ‘नदी जोड’चे नवीन भूत बाटलीतून आज बाहेर आलेले दिसले. ही योजना केंद्राकडे मंजुरीला गेल्यावर केंद्राचे किमान 2 अर्थसंकल्प झाले आहेत. मात्र या योजनेला एक दामडाही घोषित झालेला नाही.

तर दुसरीकडे, एक नवे बीड बनवण्यासाठी लोकांनी काम करावं असं मुख्यमंत्री बोलले. पण नवीन बीड करायचे असेल तर रोज नवनवीन भ्रष्टाचाराचे आरोप होणारे आणि आतापर्यंत गुन्हेगारी पोसणारे लोक मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये ठेवले तर बीडची गुन्हेगारांपासून मुक्ती होणे नाही असेही दानवे म्हणाले.