गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या देशातल्याच, मग दावोस दौरा कशासाठी? अंबादास दानवे यांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोल दौऱ्यावर गेले आहेत. पण राज्यात गुंतवणूक करणाऱ्या बहुतांश कंपन्या या हिंदुस्थानातल्याच आहेत, त्यामुळे हा दावोस दौरा कशासाठी असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. तसेच गेल्या वर्षी झालेल्या सामंजस्य करार किती अंमलात आले याची माहितीही त्यांनी महायुती सरकारकडे मागितली.

अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दावोस दौऱ्यात झालेल्या गुंतवणुकीची यादी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ही यादी पोस्ट करून दानवे यांनी म्हटले आहे की, ही आहे दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार झालेल्या कंपन्यांची यादी. यात एकूण 29 कंपन्या आहेत ज्यातील केवळ एक विदेशी उद्योग आहे. उर्वरित 28 या हिंदुस्थानातील उद्योग आहेत. या 28 पैकी 20 तर महाराष्ट्रातील निघाल्या. अजून सांगतो, या 20 पैकी 15 मुंबई, 4 पुणे तर एक ठाण्यात आहेत! मग दावोस दौरा कशासाठी!

माझे आवाहन आहे की गतवर्षी झालेल्या सामंजस्य करारातील किती करार आतापर्यंत अंमलात आले आहेत हे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सांगावं! तसेच हा आकडा 20-25 टक्क्यांपेक्षा अधिक नक्कीच नसणार असेही दानवे म्हणाले.