विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते; पण या अधिवेशनात अशी कोणतीच चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती; पण महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही. शेतकऱयांना गंडवले. या अधिवेशनातून सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी सरकारवर तोफ डागली. बीड आणि परभणीतील घटना माणुसकीला काळिमा फासणाऱया आहेत. सरकारने गुंडगिरी पोसल्याचे परिणाम बीडमध्येही दिसले. पोलिसांमध्येही गुंडाराज आले आहे का, असा प्रश्न पडतो, असा टोला त्यांनी लगावला.