जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतो! अंबादास दानवे यांचा विधान परिषदेत गंभीर आरोप

जलसंपदा विभागातील सर्व निर्णय मोहित कंबोज घेतो. या विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर हे कंबोजला विचारल्याशिवाय पाणीही पीत नाहीत. मंत्र्याला त्या खात्याचा कारभार माहीत आहे की नाही ते मला माहीत नाही. मात्र, जलसंपदा विभाग कंबोज चालवत आहे आणि त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना अंबादास दानवे यांनी राज्य सरकारच्या अनेक विभागांत सुरू असलेल्या गैरप्रकारांची माहिती सभागृहाला दिली. राज्यात महिलांचा सतत होत असलेला अपमान, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना, बेळगाव-कर्नाटक सीमावादावर स्थापन केलेल्या समितीचा समन्वयाचा अभाव, शेतकऱयांवर थोपवलेला शक्तिपीठ मार्ग, दावोसमध्ये केलेले करार या मुद्दय़ांवर दानवे यांनी राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणातील मुद्दे खोडून काढत त्यावर चौफेर टीका केली. यावेळी जलसंपदा विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर त्यांनी बोट ठेवले.

अशी मंडळे मराठीला न्याय देणार नाहीत

साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या कवितेवर आधारित चित्रपटावर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाने ढसाळ कोण आहेत, असा प्रश्न केला होता. ढसाळ यांची शैली ही क्रांतिकारक आणि ऊर्जा देणारी आहे. असे असताना अशी मंडळे मराठीला काय न्याय देणार, असा सवाल दानवेंनी केला.

दोघांचे सीडीआर तपासा

जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर हे कंबोज यांना विचारल्याशिवाय कोणतेही काम करत नाहीत. या विभागाचे निर्णय घेणारे कंबोज सरकारचे जावई आहेत का, असा सवाल करत कंबोज व कपूर यांच्या संभाषणाचे सीडीआर तपासा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी सभागृहात केली.