साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त दररोज भाविकांची उच्चांकी गर्दी होत आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवस्थान व्यवस्थापन समिती आणि पोलिसांची यंत्रणा ढेपाळली. अर्ध्या तासात देवीचे दर्शन मिळण्याची व्यवस्था केली असताना आज प्रत्यक्षात रांगेतून दर्शनासाठी तब्बल सात ते आठ तास लागत होते, शिवाय मुखदर्शनासाठीही दोन-तीन तास लागत होते. शनिवार, रविवार सलग सुट्टीचे दिवस आल्याने कोल्हापुरात गर्दीचा महापूर लोटला. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी रविवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासूनच भाविकांनी रांगेत गर्दी केली होती. दिवसभरात ही गर्दी इतकी वाढली की, भाविकांना दर्शनासाठी तब्बल सात ते आठ तास रांगेत उभे राहावे लागले. 2 लाख 74 हजार 347 भाविकांनी आज दर्शन घेतले.