यंदा अमरनाथ यात्रा 3 जुलै 2025 पासून सुरू होणार

2025 मधील अमरनाथ यात्रा ही येत्या 3 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. ही यात्रा 39 दिवस चालणार असून रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार आहे. अमरनाथ श्राइन बोर्डाच्या बैठकीत ही तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही बैठक जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला अमरनाथ श्राइन बोर्डाचे अध्यक्षदेखील उपस्थित होते.

अमरनाथ यात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो भाविक पवित्र अमरनाथ गुहेत बाबा बर्फानी यांचे दर्शन घेण्यासाठी कठीण प्रवास करून जातात. यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होईल, जेणेकरून भाविकांना वेळेत त्यांच्या प्रवासाचे नियोजन करता येईल. अमरनाथ यात्रेदरम्यान प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे.