राज्यात महायुती सरकार आले, मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ खातेवाटप, दालन आणि बंगल्यांचे वाटपही झाले, पण तरीही महायुतीच्या कारभाराला अद्याप वेग आलेला नाही. कारण पौष महिन्यामुळे मंत्रालयाच्या कामाला ब्रेक लागला आहे. या महिन्यात शुभकार्य करू नये असा समज असल्याने पालकमंत्र्यांपासून मंत्र्याचे पीए, पीएस, ओएसडींच्या नियुक्त्याही रखडल्या आहेत. त्यामुळे मंत्री कार्यालयाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी अजून किमान पंधरा ते वीस दिवस लागतील असे सांगण्यात येते.
मंत्रालयातील बहुतांश मंत्र्यांच्या दालनात दुरुस्तीची कामे सुरु आहेत. मंत्री कार्यालयातील नियुक्त्याही झालेल्या नाहीत. पौष महिन्यात शुभकार्य करीत नाहीत. त्यामुळे मंत्र्यांचे पीए, पीएस अशा नियुक्त्या रखडल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्याही रखडल्या आहे. पौष महिना 29 जानेवारीला संपेल. त्यानंतर माघ महिना सुरू होईल. त्यानंतरच पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या होतील. परिणामी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते यंदाही ध्वजारोहण होण्याची चिन्हे आहेत.
महायुतीचे खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालनांचे वाटप झाले. मोजक्या मंत्र्यांनी दालनात प्रवेश केला, तर काही मंत्र्यांनी अजूनही दालनात कार्यभार स्वीकारला नाही. काही मंत्र्यांनी आपल्या दालनात वास्तुशास्त्रानुसार बदल सुरू केले आहेत. दालनाच्या नूतनीकरणाचे कामही पौष अखेरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर माघ महिन्यात बहुतांश मंत्री आपल्या दालनाचा ताबा घेतील असे सांगण्यात येते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकांचा धडाका लावला आहे.
पोलीस व्हेरीफिकेशन
मंत्र्यांचे पीए-पीएस, ओएसडी यांचे पोलीस व्हेरिफिकेशन व त्यांचा पूर्वेतिहासही तपासला जाईल. त्यानंतरच नियुक्ती होईल. काही मंत्र्यांकडे मुख्यमंत्री कार्यालयातून पडताळणी झालेल्या पीए-पीएसच्या चार नावांची यादी पाठवण्यात आली आहे. त्यातून अधिकारी निवडायचे आहेत. भाजपच्या काही मंत्र्यांनी फार आढेवेढे न घेता मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या नावांना होकार कळवून टाकला आहे.
पीए-पीएसच्या यादीवर मुख्यमंत्र्यांची मोहोर
मंत्र्यांचे पीए, पीएस, ओएसडी यांच्या नावाच्या यादीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीची मोहोर उमटणार आहे. मंत्र्यांच्या पीए-पीएसचे अर्ज सध्या सामान्य प्रशासन विभागाकडे आहेत. त्याची पडळताळणी झाल्यावर मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडे जाईल. मग श्रीकर परदेशी त्यांच्या मुलाखती घेऊन अंतिम यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवतील. मुख्यमंत्र्यांनी यादीला मान्यता दिल्यानंतर त्यांच्या नियुक्त्यांचे आदेश जारी होतील. सध्या काही अधिकाऱयांनी मंत्र्यांचे काम करण्यास सुरुवात केली आहे, पण अधिकृतपणे त्यांच्या नियुक्त्यांचे पत्र दिलेले नाही.