Allu Arjun Release – अल्लू अर्जुनची सुटका; रात्र तुरुंगातच काढली, बाहेर येताच म्हणाला…

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता अल्लु अर्जून याची शनिवारी सकाळी तुरुंगातून सुटका झाली. रात्र तुरुंगात काढल्यानंतर शनिवारी सकाळी तो बाहेर आला. यावेळी तुरुंगाबाहेर त्याच्या कुटुंबीयांसह चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अल्लू अर्जुन बाहेर येताच कुटुंबियांनी त्याची नजर काढली. यानंतर त्याने सर्वांची गळाभेट घेतली. तसेच हात उंचावत आणि नमस्कार करत चाहत्यांचेही आभार मानले.

‘पुष्पा-2’ चित्रपटाच्या प्रीमियरवेळी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. याविरोधात अल्लू अर्जुनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका केली. मात्र यानंतरही त्याला रात्र तुरुंगात काढावी लागली. यामुळे त्याच्या वकिलांनीही संताप व्यक्त केला.

दरम्यान, तुरुंगातून बाहेर येताच अल्लु अर्जून याने माध्यमांशी संवाद साधला. सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभार. चाहत्यांनाही धन्यवाद. चिंतेची काही बाब नसून मी ठीक आहे. मी कायद्याचे पालन करणारा नागरीक असून तपासात पूर्ण सरकार्य करेल. पुन्हा एकदा त्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. ती एक दुर्भाग्यपूर्ण घटना होती. जे काही झाले त्याचा मला खेद आहे, असे अल्लू अर्जुन यावेळी म्हणाला.