
शीवमधील लायन ताराचंद बापा रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शीव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली असून प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुजाता सोनटक्के असे मृत महिलेचे नाव असून तिला शुक्रवारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. 20 एप्रिल रोजी सकाळी सुजाताला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. दुपारी 12 वाजता त्यांनी पह्नवरून नातेवाईकांशी संपर्पही साधला. मात्र नंतर प्रचंड खोकला येतोय, श्वास घेण्यासाठी त्रास जाणवतोय अशी तक्रार त्यांनी केली. तरीही त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले नाहीत. दुपारी दीड वाजता तिला पुन्हा आयसीयूमध्ये नेण्यात आले. ईसीजी करण्यात आली. 1 वाजून 35 मिनिटांनी तिला मृत घोषित करण्यात आले. या वेळी रुग्णालयात पुणीही वरिष्ठ डॉक्टर, आरएमओ उपलब्ध नव्हते. केवळ नर्स उपलब्ध होत्या, असे सुजाताच्या पुटुंबीयांनी सांगितले. डॉ. सुहास देसाई हे रुग्णालयाचे संचालक असून सुजातावर डॉ. नितीन गोटे उपचार करत होते.
वॉर्डमध्येच सुजाताचा मृत्यू
सुजाता सोनटक्के हिचा मृत्यू वॉर्डमध्येच झाला होता. नर्सने सुजाता हिला अतिदक्षता विभागात नेऊन केवळ उपचार करण्याचे ढोंग केल्याचा दावा सुजाताच्या पुटुंबीयांनी केला आहे.
डॉक्टरांकडून महिलेला योग्य उपचार – डॉ. सुहास देसाई
सुजाता हिच्यावर डॉक्टरांकडून योग्य उपचार करण्यात आले. त्यांची कार्डिओ पल्मनरी सिटी स्कॅन चाचणीही करण्यात आली. त्यात तिच्या हृदयात किंवा फुप्फुसात कुठलेही ब्लॉकेज किंवा प्रॉब्लेम आढळले नाहीत. तिला सर्व प्रकारची आवश्यक औषधे दिली. आमच्याकडे सर्व प्रकारचे कागदोपत्री पुरावे आणि व्हिडीओही आहेत, असे रुग्णालयाचे संचालक डॉ. सुहास देसाई यांनी सांगितले. रुग्णालयात डॉक्टरांची संपूर्ण टीम आणि प्रशिक्षित नर्सही उपलब्ध होत्या. वॉर्डमध्ये असताना त्यांना त्रास जाणवू लागला. त्या वेळी त्यांना तत्काळ आयसीयूत हलवण्यात आले आणि सीपीआरही देण्यात आला. परंतु हृदय हा असा अवयव आहे ज्याची आपण कुठल्याही प्रकारची शाश्वती देऊ शकत नाही. अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असे डॉ. देसाई म्हणाले.