रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्यामुळे चतुशृंगी पोलिसांनी हॉटेल व्यवसायिकाला पोलीस व्हॅनमध्ये बसवून अरेरावी केल्याचा आरोप संबंधित व्यावसायिकाने केला आहे. रात्री सव्वा अकरा वाजेनंतरही हॉटेल सुरू असल्याने पोलिसांनी पेट्रोलिंग करताना दमदाटी करून हॉटेल बंद केले. हॉटेलमधील कामगार, मालकाला गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर सोडून दिल्याचा आरोप द खालसा जंक्शन व्यासायिकाने केला आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली आहे. मात्र पोलिसांनी आरोपाचे खंडन केले आहे.
चतुशृंगी पोलिस हे सोमवारी रात्री उशिरा पेट्रोलिंग करताना संबंधित हॉटेल व्यासायिकाला वेळेबाबत सूचित केले होते. मात्र, पोलीस पेट्रोलिंग वाहन परिसरात दुसऱ्यांदा गेल्यानंतरही हॉटेल सुरू होते. त्यामुळे संबंधित व्यासायिकाला विचारपूस करण्यासाठी गाडीत बसवून चौकीत नेले. त्याठिकाणी त्यांची विचारपूस करून त्यांना सूचित केले. त्यानंतर संबंधिताना लगेच सोडून देण्यात आले. त्या परिसरात मोठ्या प्रमाणात मद्यपी असल्याने आम्ही वारंवार पेट्रोलिंग करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी दिली आहे.