सोशल मिडियातील पोस्ट लाईक करणे गुन्हा नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सोशल मिडियातील विशिष्ट पोस्ट लाईक करणे म्हणजे ती पोस्ट प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे नव्हे. किंबहुना, तशा प्रकारे पोस्टला लाईक करणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती सौरभ श्रीवास्तव यांच्या एकलपीठाने इम्रान खान विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणात हा निर्णय दिला. याचवेळी न्यायालयाने इम्रान खानविरोधातील खटला रद्द केला आहे.

माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 67 हे अश्लील सामग्रीच्या शेअरिंगशी संबंधित आहे. इतर उत्तेजक सामग्रीच्या शेअरिंगशी या कलमाचा संबंध येत नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. ‘कामुक किंवा विवेकी हिताचे आवाहन’ या शब्दांचा अर्थ लैंगिक हित आणि इच्छेशी संबंधित आहे. त्यामुळेच कलम 67 मध्ये इतर उत्तेजक सामग्रीसाठी कोणतीही शिक्षा नमूद करण्यात आलेली नाही, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.

इम्रान खानने सोशल मीडियावरील कथित ‘प्रक्षोभक’ पोस्टला लाईक केली, त्यामुळे मुस्लिम समुदायातील सुमारे 600-700 लोक एकत्र जमले होते, असा आरोप करीत उत्तरप्रदेश पोलिसांनी इम्रान खानविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत प्रक्षोभक’ पोस्ट प्रकाशित आणि प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करतानाच न्यायालयाने सोशल मिडियातील विशिष्ट पोस्टला केवळ लाईक करणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा ठरत नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे.