विष्णू चाटेचा मोबाईल शोधा, त्यात हत्येचे सगळे पुरावे! धनंजय देशमुख यांची मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे याचा मोबाईल शोधा, त्यात हत्येचे सगळे पुरावे असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. तपास यंत्रणांनी हा मोबाईल सापडणे अशक्य असल्याचे न्यायालयाला सांगून अगोदरच हात वर केले आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या मोबाईलवरूनच अवादा पंपनीच्या अधिकाऱ्यांना वाल्मीक कराडने खंडणीसाठी कॉल केला होता. त्याचबरोबर संतोष देशमुख यांना करण्यात आलेली अमानुष मारहाणही विष्णू चाटेच्याच मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून दाखवण्यात आली होती. विष्णू चाटेने हा मोबाईल नाशिक परिसरात फेकून दिला. स्थानिक पोलीस, सीआयडी, एसआयटीच्या पथकांनी नाशिक परिसर धुंडाळला पण मोबाईल सापडला नाही. शेवटी तपास यंत्रणांनी मोबाईल सापडत नसल्याची माहिती न्यायालयाला दिली.

आज यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटेचा मोबाईल हा हत्या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा असल्याचे म्हटले. हा मोबाईल शोधा त्यात अनेक महत्त्वाचे पुरावे सापडतील तसेच या प्रकरणातील आरोपींची स्पेशल रिमांड घेण्याची मागणीही त्यांनी केली.

महंत नामदेव शास्त्रींचे कीर्तन रद्द

संतोष देशमुख हत्या प्रकरण, अवादा कंपनी खंडणीची भानगड, लागोपाठ बाहेर येणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि त्यामुळे राजीनाम्यासाठी वाढलेला दबाव अशा कोंडीत सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचे पुण्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर आयोजित करण्यात आलेले कीर्तन अखेर रद्द करण्यात आले आहे. या कीर्तनाला मराठा कार्यकर्त्यांनी विरोध केला होता.