महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांवरील अतिक्रमणे हटवा, आझाद मैदानात सर्वपक्षीय आंदोलन

महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांवरील अतिक्रमण हटवून बौद्ध लेण्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यात यावे. बिहारमधील महाबोधी बुद्धगया विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी आझाद मैदान येथे सर्वपक्षीय बौद्ध बांधवांनी जोरदार आंदोलन करत सरकारचे लक्ष आज वेधले.

बौद्ध लेण्यांच्या ठिकाणी करण्यात आलेली अतिक्रमणे काढून टाकावीत. प्रत्येक बौद्ध लेण्यांच्या पायथ्याशी बौद्ध भिक्खूंच्या राहण्याची व्यवस्था करावी. पुंभमेळ्याप्रमाणे बुद्ध जयंती महोत्सव 11 मे रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे सन्पन्न करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. या आंदोलनामध्ये शिवसेना पक्षसंघटक विलास रुपवते यांच्यासह रमेश जाधव, प्रतीक कांबळे, अशोक कांबळे, सागर संसारे, सिद्धार्थ कासारे, दीपक केदार, रमेश गायकवाड, गोपी मोर आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.