मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला अठरा दिवस उलटून गेले, मात्र या कटाचा मास्टरमाईंड अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. देशमुख हत्याकांडाच्या सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. जिह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह लाखो लोक या मोर्चात सहभागी होणार असून या पार्श्वभूमीवर शहरात अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.
मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस, प्रकाश सोळुंके, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित यांच्यासह मराठा आरक्षण आंदोलनासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे-पाटील हे सहभागी होणार आहेत. सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार असून, सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.