टोल हद्दपारीसाठी आजऱ्यात सर्वपक्षीय मोर्चा; बंदला प्रतिसाद

शहरातून जाणाऱ्या संकेश्वर-बांदा महामार्गावर टोलवसुली करण्यासाठी आजरा मिनी एमआयडीसीनजीक उभारलेल्या टोलनाक्यावर आजरावासीयांनी आज सर्वपक्षीय विशाल मोर्चा काढत टोलवसुली हद्दपार करण्याची मागणी केली. तसेच टोलवसुलीविरोधात पुकारण्यात आलेल्या आजरा बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.

‘आजरेकर नागरिक, व्यावसायिक आणि वाहनधारकांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे,’ अशा घोषणांनी वातावरण टोलमुक्तीमय झाले होते. या पार्श्वभूमीवर टोलविरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखालील मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच आजच्या आजरा बंदला व्यापारी असोसिएशनकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

टोलविरोधी संघर्ष समितीने आवाहन केल्याप्रमाणे दुपारी हॉटेल मिनर्व्हापासून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी टोलविरोधासाठी परिधान केलेल्या टोप्या लक्षवेधी ठरत होत्या. टोलमुक्ती मिळालीच पाहिजे, टोल रद्द झाला पाहिजे, या आशयाच्या घोषणांनी वातावरण टोलमुक्तीमय झाले. टोलमुक्तीसाठी बनविण्यात आलेल्या प्लाझाजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

संपत देसाई म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी आजरेकरांनी मोठे सहकार्य केले. मात्र, टोलचे बेकायदेशीर भूत आमच्या मानगुटीवर लादण्याचा विश्वासघातकी प्रयत्न होत आहे. आम्हाला टोलमुक्ती मिळाली पाहिजे. हा मार्ग बांधा, वापरा, हस्तांतर करा तत्त्वावर झालेला नाही. महामार्ग प्राधिकरणने निधी गुंतवला आहे. यातून फक्त रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण झाले आहे. महामार्ग निकषही पाळले गेले नाहीत. अशात टोलवसुलीचा घाट का? हा मूळ प्रश्न आहे. महामार्गाच्या कामाचे पैसे राज्य शासनाने केंद्र शासनाला देऊन रस्ता टोलमुक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली. तर टोलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा कुटील डाव हाणून पाडू, असा इशारा त्यांनी दिला.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, शैलेश देशपांडे, उमेश आपटे, वसंतराव धुरे, प्रभाकर कोरवी, युवराज पोवार, तानाजी देसाई, उल्हास त्रिरत्ने आदींनी मनोगते व्यक्त केली. आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे ए. वाय. पाटील यांनी भाषणातून व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरध्वनीवरून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.