सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन ईव्हीएम प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा – रोहित पवार

सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन ईव्हीएम प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केली आहे. ‘एक्स’वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.

‘एक्स’वर केलेल्या पोस्टवर रोहित पवार म्हणाले की, ”विधानसभेच्या आश्चर्यकारक निकालावर गावातल्या पारापासून तर शहरातल्या कट्ट्यावर बसलेल्या कोणालाही विश्वास बसलेला नाही. लोकशाहीत शंका उपस्थित होत असतील तर शंकांचे निरसन देखील व्हायलाच हवे.”

ते म्हणाले, ”ईव्हीएमच्या या खेळामुळे प्रामाणिकपणे लढणारे उमेदवार, कार्यकर्त्यांसह प्रामाणिकपणे मतदान करणाऱ्या मतदारांमध्येसुद्धा फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे. ईव्हीएमचा हा खेळ असाच चालू राहिला तर उद्या निवडणुका लढण्याची हिंमत सुद्धा कोणी करणार नाही. शिवाय मतदार सुद्धा मतदान करणार नाहीत.”

रोहित पवार पुढे म्हणाले की, ”सर्वपक्षीय नेते या विषयात लक्ष घालतील, ही सर्व कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असली तरी सर्वत्र मात्र अपेक्षाभंगच होताना दिसत आहे. त्यामुळे आता तरी सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन ईव्हीएम प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा, ही विनंती!”