बीड, परभणीतील हत्याकांडांच्या निषेधार्थ 25 जानेवारीला मुंबईत सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ 25 जानेवारी रोजी मुंबईत सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाची हाक देण्यात आली आहे. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा हा मोर्चा काढण्यात येणार असून त्यात सर्वपक्षीय नेते आणि मराठा क्रांती मोर्चासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

मराठा क्रांती मोर्चासह राज्यातील विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन बीड आणि परभणीतील घटनांच्या मुद्दय़ावर चर्चा केली. यावेळी मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्याबाबतही संघटनांमध्ये एकमत झाले.

यावेळी शरद पवार यांनी दोन्ही घटनांचा तीव्र निषेध केला. या घटनांमुळे राज्यातील सामाजिक सलोखा ढासळण्याची शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली. दोन्ही प्रकरणांतील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि या घटनांचा समर्पक तपास करण्यासाठी आपली भूमिका निर्णायक असेल, असे आश्वासनही शरद पवार यांनी दिल्याची माहिती शिष्टमंडळातील अमोल मातेले यांनी दिली. मुंबईत होणाऱ्या या जनआक्रोश मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आले. या शिष्टमंडळात आशीष राजे गायकवाड, धनंजय शिंदे, सुभाष सुर्वे, चंद्रकांत भोसले, बालुशा माने आदींचा समावेश होता.