
वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. एआयएमपीएलबीचे सचिव मोहम्मद वक्वार उद्दीन लतीफी यांनी याबाबत निवेदन जारी केले आहे. 17 मार्च रोजी दिल्लीत वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात मोठ्या प्रमाणावर यशस्वी आंदोलन झाले. यानंतर आता देशव्यापी आंदोलनाची घोषणा केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सर्व मुस्लिम संघटना, नागरी समाज गट आणि दलित, आदिवासी, ओबीसी तसेच इतर अल्पसंख्याक समुदायातील नेत्यांचे वक्फ विधेयकाविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी एआयएमपीएलबीचे प्रवत्ते आणि वक्फ विधेयकाविरुद्ध कृती समितीचे निमंत्रक एस क्यु आर इलियास यांनी आभार मानले. या गटांच्या एकत्रित पाठिंब्याशिवाय दिल्लीतील आंदोलनाला यश मिळणे शक्य नव्हते असे ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी विरोधी पक्षांचे आणि संसद सदस्यांचेही आभार मानले.
पहिल्या टप्प्यात विधानसभेसमोर निषेध आंदोलन
बोर्डाच्या 31 सदस्यीय कृती समितीने वादग्रस्त आणि भेदभाव करणाऱया तसेच अन्यायकारक अटी लादणाऱया विधेयकाचा विरोध करण्यासाठी सर्व घटनात्मक, कायदेशीर तसेच लोकशाही मार्गाचा अवलंब करण्याचा संकल्प केला आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याचा एक भाग म्हणून 26 मार्च रोजी पाटणा तर 29 मार्च रोजी विजयवाडा येथे राज्य विधानसभेसमोर मोठया निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.