
वक्फ सुधारणा विधेयकातील तरतुदी मुस्लिम समुदायाचे नुकसान करणारे आणि त्यांच्या अधिकारांना हानी पोहोचवणारे असल्याचे आरोप करत अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल बोर्डासह विविध मुस्लिम संघटनांनी देशभरात तीव्र निदर्शने केली. लखनौ, वाराणसी, बरेली, दिल्ली, पाटणासह विविध शहरांमध्ये मुस्लिम समुदायाने काळी पट्टी बांधून सरकारला विरोध दर्शवला. विधेयकाला देशभरातून होत असलेला विरोध पाहता या विधेयकाला मंजुरी मिळाली तर आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वक्फ सुधारणा विधेयकावरील चर्चेसाठी गठीत करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीकडे आम्ही विधेयकातील तरतुदींबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच काही सुधारणांवर विचार करण्याची सुचनाही केली होती. परंतु, आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे ज्येष्ठ कार्यकारी सदस्य मौलाना खालिद रशीद फरंगी महली यांनी केला. मुस्लिम समाजाच्या भावनांचा विचार करावा आणि विधेयकातील तरतुदींना विरोध करावा असे आवाहन आम्ही सर्व खासदारांना केल्याचे मौलाना खालिद राशीद यांनी सांगितले. दरम्यान, भाजपा अचानक मुस्लिमांचा द्वेष करणारी कशी बनली. मुस्लिमांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या नावावर सरकार सरळसरळ आम्हाला धोका देत आहे, असा आरोप इत्तेहाद ए मिल्लत परिषदेचे प्रमुख मौलाना तौकीर रझायांनी केला.
विधेयक कुठल्याही परिस्थिती मंजूर होऊ देणार नाही
वक्फ सुधारणा विधेयक कुठल्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही, असे इत्तेहाद ए मिल्लत परिषदेचे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी सांगितले. आमच्यावर वक्फच्या संपत्तीवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. परंतु, आमच्या पूर्वजांनी संपत्ती वक्फला दान केली होती. अनेक प्रशासकांनी देखील हेच केले. मंदिरे बांधली आणि संपत्ती त्यांना दान केली. आता तीच संपत्ती हिरावून घेतली जात आहे. मुस्लिमांना त्रास देणे आणि त्यांच्या जमिनींवर कब्जा करणे हाच या विधेयकाचा उद्देश असल्याचा आरोप रझा यांनी केला. आम्ही विधेयकातील तरतुदी कुठल्याही परिस्थितीत मान्य करणार नाही. लोकशाही मार्गाने आम्ही या विधेयकाला विरोध करू असेही ते म्हणाले.