दरोडेखोराला मिंधे आमदार दळवींचा आशीर्वाद ? गुन्हेगारांशी काय कनेक्शन, अलिबागकरांचा सवाल

अलिबाग-पेण मार्गावरील तीनविरा धरणाजवळ सोनारांकडून दीड कोटींचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर फरार झाले होते. याप्रकरणी अलिबागचे मिंधे आमदार महेंद्र दळवी यांचे घरगुती काम करणारा कर्मचारी आणि चालक समाधान पिंजारी याच्यासह दळवी यांचे दोन बॉडीगार्ड आणि आणखी एक घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली, मुद्देमालही जप्त केला. पण आता या प्रकरणातील गुन्हेगारांना आशीर्वाद देतानाचे दळवी यांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले असून त्यांचे लागेबांधे या दरोडेखोरांशी आहेत का? असा सवाल केला जात आहे. लोकप्रतिनिधीच गुन्हेगारांना पोसण्याचे काम करीत असल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वृत्ती वाढत चालल्याचा संतापही व्यक्त होत आहे.

अलिबाग-तीनविरा येथे झालेल्या दरोडा प्रकरणामुळे तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दीड कोटी रुपयांचा दरोडा घालणारा समाधान पिंजारी हा मिंधे आमदार महेंद्र दळवी यांचा घरेलू काम करणारा अत्यंत विश्वासू चालक असल्याचे उघड झाले आहे. आमदारांचे दोन बॉडीगार्ड आणि अन्य दोघे या दरोड्यात सहभागी आहेत. त्यातच आता दरोडेखोर समाधान पिंजारी हा आमदार महेंद्र दळवी यांचा आशीर्वाद घेत असताना त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या दरोडेखोरांना, गुंडांना आमदारांचा आशीर्वाद आहे का? असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता समाधान पिंजारी चौकशीसाठी हजर राहिला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मग पोलिसांनी त्याला विश्वासात घेतल्यावर त्याने जबाबात दिलेली हकीकत सांगितली. त्यात आमदारांसह त्याच्या सुरक्षारक्षकांची नावे समोर आली.

नेमके काय घडले?

या प्रकरणातील दरोडेखोर समाधान पिंजारी हा मिंधे आमदार महेंद्र दळवी यांचा विश्वासू घरेलू कामगार आणि चालक आहे. समाधान पिंजारी याने नागपूरचे सोन्याचे व्यापारी नामदेव हुलगे यांच्याशी संपर्क साधला. शरद पुळे याच्याकडे सात किलो सोने असून ते पाच कोटी रुपयात देतो असे आमिष पिंजारी याने हुलगे यांना दाखवले. सोने स्वस्त मिळत असल्याने ते खरेदी करण्याचा निर्णय घेऊन हुलगे दीड कोटी रुपये घेऊन अलिबागकडे निघाले. याचवेळी दळवी यांचा आणखी एक घरेलू कर्मचारी दीप गायकवाड याने तीनविरा धरणाजवळ गाडी थांबवून आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करत हुलगे आणि त्यांच्या माणसांना गाडीतून उतरवले आणि त्यानंतर दीप गायकवाडने कारसह पनवेलच्या दिशेने पळ काढला. दरोड्यातील लुटलेले दीड कोटी रुपये आधी दीप गायकवाडच्या घरी ठेवण्यात आले. नंतर आरोपी समाधान पिंजारी याने ही रक्कम त्याचा सांगलीतील चुलत भाऊ विशाल पिंजारी आणि अक्षय खोत यांच्या ताब्यात दिली.