![fraud](https://www.saamana.com/wp-content/uploads/2021/05/fraud-696x447.gif)
नागपूर व कामोठे येथील सोनारांना स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडील 1 कोटी 50 लाखांची रक्कम लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चार आरोपींना अटक केली असून त्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून रक्षकच भक्षक निघाल्याची टीका होत आहे.
आरोपी समाधान पिंजारी हा अलिबागमध्ये रोजगारासाठी वास्तव्यास आहे. त्याने आपल्या परिचयातील नागपूर येथील सोनार नामदेव हुलगे यांच्यासोबत संपर्क साधून अलिबागमधील शंकर कुळे याच्याकडे 7 किलो सोने असून ते तुम्हाला 5 कोटी रुपयांना मिळवून देतो असे आमिष दाखवले. यांनतर नामदेव हुलगे यांनी सदर बाब कामोठे येथे सोनार असलेल्या ओमकार वाकशे यांना सांगितली. यांनतर दोन्ही सोनारांनी यामधील काही सोने विकत घेण्याचा निर्णय घेत नामदेव याने 65 लाख तर ओमकार याने 85 लाख असे 1 कोटी 50 लाख रुपयांची रक्कम जमा करून अलिबाग गाठण्याचा निर्णय घेतला.
प्लॅननुसार काही वेळातच पोलीस हजर
3 फेब्रुवारी नामदेव हुलगे आपल्या सहकाऱ्यासह कामोठे येथे ओमकार वाकशे यांच्याकडे आले. यावेळी आरोपी समाधान पिंजारी हा कामोठे येथे त्यांना भेटण्यास गेला. यानंतर 4 फेब्रुवारी रोजी हुलगे व वाकशे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह अलिबागला जाण्यासाठी कारने निघाले. यावेळी समाधान पिंजारी याने त्याचा सहकारी दीप गायकवाड याला इनोव्हा गाडी घेऊन पळस्पे या ठिकाणी थांबवण्यास सांगितले होते. त्यानुसार सर्वजण इनोव्हा गाडीने पोयनाडच्या पुढे तिनवीरा डॅम येथे पोहोचले. आरोपींच्या प्लॅननुसार काही वेळातच पोलीस अंमलदार समीर म्हात्रे व विकी साबळे हे गणवेशात मोटारसायकलवरून तिनवीरा येथे आले. त्यांनी सर्वांना धमकावून शिताफीने हे पैसे लंपास केले.