आणखी एक राजकीय घराणे भाजपने फोडले, पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांचा शेकापला रामराम; आज कमळाबाईचा हात धरणार

गेल्या अनेक पिढय़ा एकत्र गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या राजकीय घराण्यांमध्ये सत्तेसाठी फूट पाडणाऱ्या भाजपने महाराष्ट्रातील आणखी एका राजकीय घराण्याचा घास घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू आणि भाच्याला कमळाबाईने डोळा मारला आहे. जयंत पाटील यांचे धाकटे बंधू, अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र व जयंत पाटील यांचे भाचे आस्वाद पाटील हे शेकापला रामराम ठोकत आज मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रादेशिक पक्षांना एकापाठोपाठ एक संपवण्याचे कारस्थान रचणाऱ्या भाजपने रायगड जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच पाटील कुटुंबात ही उभी फूट पाडल्याचे बोलले जात आहे.

2014मध्ये केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर संपूर्ण देशात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला. कधी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस अशा शासकीय यंत्रणांना हाताशी धरून तर कधी राजकीय घराण्यांमध्ये कलह निर्माण करून त्या त्या पक्षातील नेत्यांची पह्डापह्डी केली. शिवसेनेतील गद्दारांना हाताशी धरून धनुष्यबाण चोरांच्या हाती दिला, त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पक्ष पह्डून तो अजित पवारांच्या पदरात घातला. आता हीच नीती रायगड जिल्ह्यातही राबवण्यात येत असून शेकापला खिळखिळे करण्यासाठी पंडित पाटील, अॅड. आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांना पह्डण्यात आले आहे. आज मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात पंडित पाटील तसेच अन्य पदाधिकारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

वादाची ठिणगी पडताच भाजपने डाव टाकला

पंढरपूरमधील पक्षाच्या अधिवेशनात पंडित पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अलिबाग विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने या वादात अधिकच भर पडली. जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील व भाचे आस्वाद पाटील हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचारापासून दूर राहिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. अलिबागची उमेदवारी आस्वाद पाटील यांना मिळावी, अशी पंडित पाटील यांची इच्छा होती. मात्र जयंत पाटील यांनी कोणाचेही न ऐकल्याची चर्चा सुरू झाली. हीच संधी साधत भाजपने फिल्डिंग लावून पाटील कुटुंबात उभी फूट पाडली.