सावधान…! पुढील आठवडाभर देशभरात उष्णतेची लाट येणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळीमुळे पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आता अवकाळीचे सावट दूर झाले असून हवामान खात्याने पुढील आठवड्याभरासाठी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. बदललेल्या हवामानामुळे देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान खात्याकडून काही राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील आठवडाभर आकाश निरभ्र राहाणार असून महाराष्ट्रातही तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूरला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 5 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या भागात उष्ण आणि दमट हवामान राहील. तसेच मुंबई, उपनगरे, ठाणे, कोकण या भागात आर्द्रता वाढणार असल्याने उकाड्यात वाढ होणार आहे. राज्यात अनेक भागात सरासरी तापमान 40 अंशांच्या पार जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने राजधानी दिल्लीतही उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. पुढील सहा दिवस दिल्लीत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे आणि या काळात तापमान 40 अंशांच्या आसपास पोहोचू शकते. पुढील सहा दिवसांत दिल्लीसह देशभरात तीव्र उष्णता जाणवेल आणि तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दक्षिण हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रावर दिसणार आहे.