
स्वारगेट स्थानकात महिलेवर झालेल्या अत्याचारानंतर तेथीलच एका बसमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या होत्या. यावरून सरकारवर टीकेची झोड उठली असतानाच आता पनवेल एसटी आगारातील भंगार गाड्यांत दारू पार्ष्या झोडल्या जात असल्याचे उघड झाले आहे. या स्थानकात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला असून अधिकारी, सुरक्षारक्षक या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या खात्यात नेमके चाललेय काय, असा सवाल केला जात आहे.
स्वारगेट बस आगारातील महिला अत्याचाराचा विषय राज्यभर गाजत आहे. त्यामुळे बस आगारातील पडीक गाड्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वर्षानुवर्षे पडीक असलेल्या एसटींसह आरटीओंची वाहनेही येथे पडून आहेत. वाहनांचा लिलाव झालेला नसल्याने ही वाहने आगारातच जागा अडवून ठेवावी लागत आहेत. पनवेल बस आगारातदेखील जवळपास ९५ वाहने पडून आहेत. दोन महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल बस आगाराची पाहणी करून या गाड्या हटवण्यास सांगितले. मंत्र्यांच्या आदेशानंतर गाड्यांची जागा तर बदलली, मात्र आजही त्या तशाच डेपोत पडून असून तिथे असलेल्या वाहनात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे.
पोलिसांनी वॉच ठेवणे गरजेचे
परिवहन विभागाने या भंगार वाहनांची विल्हेवाट लावणे आवश्यक असताना वर्षानुवर्षे ही वाहने याच ठिकाणी पडून आहेत. कायम वर्दळीचे ठिकाण असलेल्या या डेपोमध्ये दारूच्या बाटल्या आल्या कशा? याबाबत चौकशीची गरज आहे. डेपोला मद्यपी दारूचा अड्डा बनवत असतील तर अशा घटकांवर पोलिसांनीदेखील वॉच ठेवला पाहिजे अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.