विठूरायाला भेटण्यासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभावे, या हेतून असंख्य नागरिक आपापल्या परीने वारकऱ्यांची सेवा करत असतात. पंरतु या सर्वांमध्ये आघाडीवर नाव आहे, ते आळंदीतील वडगांवकर कुटुंबीयांचे. गेल्या 85 वर्षांपासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची वाहतूक करण्याची जबाबदारी वडगांवकर परिवाराच्या माध्यमातून पार पाडली जाते. 1940 पासून वडगांवकर परिवाराने ही सेवा देण्यास सुरुवात केली असून, त्यामध्ये एकदाही खंड पडलेला नाही. आता त्यांची तिसरी पिढी श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर ते आळंदी या मार्गावर वाहनसेवा देत आहे.
वडगांवकर परिवाराच्या पहिल्या पिढीमध्ये आमदार ताराचंद हिराचंद वडगांवकर आणि धनराज हिराचंज वडगांवकर यांनी सन 1940 सालापासून पालखी सोहळ्यासाठी आपली सेवा देण्यास सुरुवात केली. पहिल्या पिढीने 1975 सालापर्यंत कोणताही खंड पडू न देता पालखी सोहळ्यासाठी सेवा दिली. त्यानंतर दुसऱ्या पिढीने 1975 ते 2000 पर्यंत माजी नगराध्यक्ष सुरेशकाका वडगांवकर यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात सुमारे 25 वर्ष सेवाभाव जोपासत वाहन सेवा रुजू केली. पहिल्या दोन्ही पिढ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत वडगांवर परिवाराची तिसरी पिढी सेवा देण्यासाठी मैदानात उतरली आहे. प्रशांत वडगांवकर, जितेंद्र वडगांवकर यांच्या माध्यमातून 2000 पासून ते 2024 म्हणजेच आतापर्यंत दोन ट्रकच्या सहाय्याने वाहन सेवा दिली जात आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून सुरू असलेली सेवा पुढील काळात देखील सुरू राहिल, असे माजी नगराध्यक्ष सुरेशकाका वडगांवकर यांनी सांगितले. यावर्षी पार पडणाऱ्या सोहळ्यासाठी प्रभारी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक, अर्जुन मेदनकर, माजी नगराध्यक्ष सुरेशकाका वडगांवकर यांच्या हस्ते पुजा करून सेवेस सुरुवात करण्यात आली. यावेळी जितेंद्र वडगांवकर, दत्तात्रय शिंदे, चंद्रकांत कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.