अक्षयच्या दफनविधीसाठी कुटुंबीयांची वणवण, तीन दिवसांपासून मृतदेह कळवा रुग्णालयात

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे मंगळवारी पोलिसांनी एन्काउंटर केले. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यापासून अक्षयच्या दफनविधीसाठी कुटुंबीयांची वणवण सुरू आहे. आधी बदलापूर, त्यानंतर कळवा, ठाणे येथील स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यास काही संघटनांनी विरोध केला.

आज तर अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सर्वपक्षीयांचा विरोध असल्याने आम्ही अंत्यसंस्काराची परवानगी नाकारत असल्याचे जाहीर केल्याने पोलीस यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, मृतदेहाची हेळसांड होत असल्याने अखेर आज कुटुंबीयांनी कल्याण कोर्टात धाव घेऊन अक्षयच्या दफनसाठी बदलापूर परिसरात जमीन उपलब्ध करण्याची मागणी केली.

अक्षयच्या दफनासाठी बदलापूर परिसरात जमीन उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी अक्षयचे नातेवाईक आणि वकील कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात आले होते. या वेळी सरकार पक्षाने पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे बदलापूर पोलिसांनी अक्षयच्या नातेवाईकांना बदलापूर परिसरात दोन ते तीन जागा अक्षयच्या दफनासाठी दाखविण्याची तयारी केली. यानंतर पोलिसांनी बदलापूरमधील काही जागा कुटुंबियांना दाखवल्या. अक्षयच्या मृतदेहाचे कधी आणि कुठे दफन होणार याबाबत गुप्तता पाळली जात आहे.

सीआयडीने घेतली तीन तास झाडाझडती

आज सीआयडी पथकाने कळवा रुग्णालयात जाऊन तीन तास झाडाझडती घेतली. एन्काऊंटरनंतर अक्षय शिंदेला ज्या वेळी रुग्णालयात आणले त्या वेळी तो कोणत्या परिस्थितीत होता? उपचारापूर्वी अक्षय जिवंत होता की मृत झाला होता? जखमी पोलीस नीलेश मोरेची स्थिती काय होती? घटनाक्रम नेमका कधी झाला? याबाबत डॉक्टरांचे जबाब घेतले. अक्षयचा मृतदेह ठेवलेल्या शवागृहाकडे सीआयडी पथक फिरकले नाही.

दरम्यान, सीआयडी पथकाने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमी पोलिसांचा जबाब घेतला. याशिवाय एन्काऊंटर घडलेल्या मुंब्रादेवीच्या पायथ्याला भेट देऊन पोलीस व्हॅनची पाहणी करून मुंब्रा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून काही दस्तावेज ताब्यात घेतले.