बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या कुटुंबीयांनी जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त करीत मंगळवारी उच्च न्यायालयात दाद मागितली. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी अॅड. अमित कटारनवरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या याचिकेवर बुधवारी तातडीची सुनावणी निश्चित केली.
अॅड. अमित कटारनवरे यांनी मंगळवारी सकाळी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या घटनेकडे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाचे लक्ष वेधले. अक्षय शिंदेला बनावट चकमकीत मारले आहे. या घटनेनंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच पुराव्यांमध्ये फेरफार केला जाण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने सुनावणी घेऊन एन्काऊंटरच्या सखोल चौकशीचे तसेच अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश द्या, अशी विनंती अॅड. कटारनवरे यांनी केली. त्यावर खंडपीठाने याचिकेवर बुधवारी सकाळी तातडीने सुनावणी घेण्यास तयारी दर्शविली. याचिकेत एन्काऊंटरवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे न्यायालय सुनावणीवेळी राज्य सरकार व पोलिसांविरोधात कोणती कठोर भूमिका घेतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.