भाजपच्या ‘देवा’माशांना वाचविण्याचा खटाटोप, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमागे रश्मी शुक्ला, शाळेच्या ट्रस्टींच्या बचावासाठी गेम?

बदलापूर येथील ज्या शाळेत दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली ही शाळा भाजपशी संबंधितांची आहे. या शाळेत लहान मुलींचे पोर्न व्हीडीओ बनवले जात होते अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच भाजपशी संबंधित ‘देवा’माशांना वाचविण्याचा खटाटोप सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी एन्काऊंटरच्या या घटनेमागे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला.  या प्रकरणातील शाळेच्या फरार संचालकांच्या बचावासाठी अक्षय शिंदेचा गेम केला गेल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, चकमकप्रकरणाचा तपास आज सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलीसांनी एन्काऊंटर केले, याप्रकरणात आरोपीचे कोणीही समर्थन केलेले नाही. विरोधी पक्षांनी या एन्काऊंटवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सगळ्या घटनेचा मागे आहेत. त्या काय काय ऑर्डर देतात काय काय करतात त्याची सगळी माहिती आमचाकडे आहे. त्यामुळे एन्काऊंटरच्या या घटनेत पोलिसांचा निष्काळजीपणा कुठेही नाही. पोलीस महासंचालक आणि सरकार या दोघांचाही यामध्ये सहभाग आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये कोणालाही यांच्यावर भरवसा राहिलेला नाही. म्हणून, आमची मागणी आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या माध्यमातून यासंदर्भातील सगळी चौकशी व्हावी, जेणेकरून एकही आरोपी सुटू नये. या घटनेमध्ये कोणालाही पाठीशी घालायचे काम झाले नाही पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, असे नाना पटोले म्हणाले.

 

बदलापूर प्रकरणातील सर्व आरोपींचे एन्काऊंटर करा

भाजपा सरकार पापी व खोटारडे असून स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलत आहे. अक्षय शिंदे सारखेच बदलापूर प्रकरणातील सर्व आरोपींचे एन्काऊंटर करा, विरोधक सरकारच्या पाठीशी उभे राहितील, असे नाना पटोले म्हणाले.

बदलापूरच्या त्या शाळेत लहान मुलींचे पोर्न व्हीडीओ बनवले जात होते अशी माहिती समोर आली आहे, हे अत्यंत भयावह आहे. ती शाळा भाजपा, आरएसएसची असून शाळेतील कृत्ये लपवण्यासाठी व शाळेच्या संचालकांना वाचवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.

साध्या पाकीटमारालाही पोलीस हातकडी बांधून घेऊन जातात मग अक्षय शिंदेला हातकड्या घातल्या नव्हत्या का? तो काय तुमचा जावई होता का? ज्या पोलिसाची रिव्हॉलव्हर अक्षय शिंदेने घेतली ती लॉक नव्हती का? बदलापूर प्रकरणातील बाकीचे आरोपी अजून का पकडले गेले नाहीत? हे प्रश्न उपस्थित होतात.

अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनाही धोका; हायकोर्टात आज सुनावणी

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर त्याच्या कुटुंबियांनी जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करीत मंगळवारी उच्च न्यायालयात दाद मागितली. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी अॅड. अमित कटारनवरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या याचिकेवर बुधवारी तातडीची सुनावणी निश्चित केली.