
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एडीआरच्या आधारे दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करता येऊ शकतो का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला केला व या प्रकरणावरील सुनावणी उद्या गुरुवारपर्यंत तहकूब केली.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. अक्षयने एका पोलीस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी घुसून तो जागीच ठार झाला; मात्र ही हत्या असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर ही याचिका मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अखेर न्यायालयाने या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील मंजुळा राव यांची अमायकस क्युरी म्हणून नियुक्ती केली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर आज बुधवारी सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ हल्ला केल्याचे सांगितले न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत उद्या गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली.