उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत हा आज राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी देश-विदेशातील सर्व बड्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये बॉलीवूडच्या कलाकारांचाही समावेश आहे. दरम्यान, बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो अनंत-राधिकाच्या लग्नाला उपस्थित राहणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार आपला बहुचर्चित चित्रपट ‘सरफिरा’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सगळ्या दरम्यान अभिनेता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नालाही हजेरी लावणार होता. मात्र ‘सरफिरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली आहे. फक्त अक्षयच नाही तर त्याच्या इतर सहकाऱ्यांपैकी आणखी काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे अक्षयने स्वत:ला एका खोलीत क्वारंटाईन केले आहे. याचं कारणामुळे तो अंबानीच्या लग्न सोहळ्यात उपस्थित राहू शकणार नाही.
सरफिराच्या प्रोडक्शन हाऊसमधील जवळच्या सूत्रांनी हिंदुस्तान टाईम्स सिटीला ही माहिती दिली आहे. “अक्षय कुमार त्याच्या ‘सरफिरा’ चित्रपटाचे प्रमोशन सुरू होते. यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यावेळी आपल्या क्रू मेंबर्सपैकी काहीजणांना कोरोनाची लागण झाल्याचे अक्षयला समजले. त्यामुळे त्याने तातडीने कोविड चाचणी केली. आणि शुक्रवारी सकाळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे सध्या प्रमोशन किंवा इतर कोणत्याही कामासाठी अक्षय बाहेर पडणार नाही.
सरफिरा हा चित्रपट 2020 मध्ये आलेल्या सूरराई पोत्रू या तमिळ चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट आज चित्रपटगृहात रिलिज झाला आहे. तसेच चित्रपट निर्मात्या सुधा कोंगाराद्वारा दिग्दर्शित या चित्रपटात परेश रावल, राधिका मदन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.