
>> अक्षता सावंत
वर्ष 2018 पासून `पपेट्री हाऊस’ सातत्याने पपेट शो, पपेट्री वर्कशॉप, नाटक, कथाकथन या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील लोकांपर्यंत, संस्था, शाळांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. यात फक्त लहान मुलांसाठीच नव्हे, तर मोठय़ांसाठीही विविध सादरीकरणाची मेजवानी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. ही सादरीकरणे, कार्यशाळा, ट्रेनिंग संस्था, शाळा आणि कम्युनिटीपर्यंत पोहोचण्याचे कार्य प्रियांका कोतवाल, अक्षता सावंत, अजिता खंडागळे हे त्रिकूट सातत्याने करत असते.
आजची महिला आरोग्य, फिटनेस आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतेच आहे, पण यासोबतच कलाक्षेत्रातही! आम्ही महिला म्हणून जेव्हा कलाक्षेत्रात पपेट शोमार्फत महिलांसाठी एखाद्या पाडय़ात, कम्युनिटीत, शाळेत आणि संस्थेत `महिला सशक्तीकरण, स्त्री शिक्षण, स्त्रीभ्रूणहत्या, मासिक पाळी असे सामाजिक विषय सहजरीत्या पोहोचवतो. तेव्हा अनेक महिला, मुली यातून प्रेरणा घेतातच, शिवाय त्यांच्या चौकटीबाहेर जाऊन विचार करतात. काही क्षण का होईना, त्या आपले दुःख, समस्या विसरून जाऊन आनंदी होतात याचं आम्हाला समाधान मिळतं.
या कामात फक्त सादरीकरणच नाही, तर विविध संस्था व शाळांमधील शिक्षकांसाठी `शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा’ पपेट्री हाऊसकडून राबवल्या जातात. बालशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, मुलांना गोष्टी सांगणे आणि या गोष्टी नाटक आणि पपेट्रीच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करणे. त्यासाठी ‘गोष्टी सांगण्यासाठीच्या कार्यशाळा’ या शिक्षकांसाठी घेत असतो.
यामाजिक विषयांसोबतच मनोरंजनात्मक नाटुकल्या, पपेट शो, गोष्टींचे सादरीकरणसुद्धा केले जाते. यातूनच मुलांचा भाषाविकास, विचारप्रक्रिया आणि कल्पनाशक्तीला वाव मिळतो. यंदाच्या 2025 च्या महिला दिनानिमित्त आम्ही पपेट्री हाऊसच्या माध्यमातून `स्त्रीत्वाचा उत्सव’ (Celebration on Womenhood) या विषयावर पपेट शोचे सादरीकरण करणार आहोतच. महिलांना त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी, त्यांच्या आंतरिक शक्तीची जाणीव करून देण्यासाठी आम्ही या सादरीकरणामार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
रोजच्या धावपळीच्या जगातून पपेट शो द्वारे सादरीकरण करून तिचं स्त्रीत्व साजरे करण्याचा हा सोहळा तिला आंतरिक ऊर्जा देणारा ठरेल.